बीड : जिल्हा रुग्णालयात सध्या कोरोनातील मनुष्यबळ कमी केल्याने अनंत अडचण आहेत. शिपाई नसल्याने सर्वत्र घाण दिसते. इकडे शिपायांची कमतरता आहे, अशी ओरड असते, तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या घरी ९ तर विद्यामान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याकडे ४ असे १३ शिपाई ठेवले आहेत. एवढे लोक ठेवण्याची परवानगी नसतानाही केवळ अधिकाराचा गैरवापर करून, अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे.
कोेरोनाकाळात भरती केलेले सर्वच मनुष्यबळ दोन दिवसांपूर्वीच कमी केले आहे. आरोग्य विभागाने निधीची कमतरता असल्याचे कारण सांगत, या सर्वांना कमी करून नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचे आदेश दिले होते, परंतु आगोदरच रिक्त पदे, त्यातही काही लोक कामचुकारपणा करत असल्याने प्रामाणिक काम करणाऱ्यांवर ताण येत आहे. कोरोनाच्या एका वॉर्डात एकच शिपाई आहे. त्याच्यावरच स्वच्छता, औषधी आणणे, सिलिंडर उचलणे, डॉक्टर व परिचारिकांचे सूचनांचे पालन करणे, रुग्णांची सेवा करणे आदी कामे आहेत. त्यामुळे ताण येत आहे. सर्वत्रच शिपायांची कमतरता असल्याची ओरड आहे. असे असतानाही तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या निवासस्थानी तब्बल ७ शिपाई आणि २ महिला शिपाई असे ९ तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याकडे ४ शिपाई कार्यरत आहेत. वास्तविक पाहता, सीएसच्या घरी २ तर एसीएसला एकही शिपाई स्वत:साठी वापरता येत नाही, परंतु केवळ पदाचा गैरवापर करून हे सर्व प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत डॉ.सुरेश साबळे यांना संपर्क केला. त्यांनी आपण कामात असल्याचे सांगत, या विषयावर बोलण्यास टाळले.