परळी : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ मंदिर परिसराचा 133.58 कोटी रूपयांचा विकास आराखडा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झाला आहे. या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून वैद्यनाथ मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. या योजनेतील प्रस्तावित कामांचे सादरीकरण ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 07 ) दर्शन मंडप येथे होणार आहे.
या योजनेतुन वैद्यनाथ मंदिराच्या परिसरातील सर्व तीर्थ, सुसज्य भक्त निवास, वैद्यनाथ देवल कमिटीच्या अधिपत्याखालील मंदिरांचा विकास तसेच डोंगर तुकाई, कालरात्री देवी मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेतील ही कामे टप्याटप्याने करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे वैद्यनाथ मंदिर परिसराबरोबरच परळी शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या कामांचे सादरीकरण रविवारी सकाळी 10.00 वाजता वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन मंडप येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.