लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील साबलखेडमध्ये पहिल्या दिवशी पाच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाच्या पथकाकडून गावात ६५७ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ जण पाॅझिटिव्ह आढळून आल्याची माहिती खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. शुभांगी पैठणे यांनी दिली.
आष्टी तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा नव्याने वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाकडून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झीरो-डेथ मिशन राबविण्यात येत आहे. तालुक्यातील साबलखेड गावात गुरुवारी पहिल्या दिवशी पाच रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्र व साबलखेड ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दुसऱ्या दिवशी साबलखेडमध्ये तातडीने अँटिजन चाचणी शिबिर घेण्यात आले. येथील देसाई, गाडे व साबळे वस्तीवरील नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. या शिबिरात ६५७ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६४३ निगेटिव्ह, तर १४ कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. पाॅझिटिव्ह रुग्णांना आष्टी येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. शुभांगी पैठणे यांनी दिली.
साबलखेड येथील सरपंच श्रीमती कमल साबळे, उपसरपंच शरद देसाई, ग्रामसेविका सुनीता वेडे, ग्रामपंचायत सदस्यांसह आरोग्य समुदाय अधिकारी मयूर कदम, सौरभ शिंदे, आरोग्य सेविका पूजा गिरी, आरोग्यसेवक विलास धोत्रे, विनोद अंभोरे आदींनी अँटिजन शिबिरासाठी परिश्रम घेतले.
तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंलबजावणी करण्याबाबत आवाहन केले.
....
कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी शासन नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून आरोग्याची काळजी घ्यावी.
- डाॅ. शुभांगी पैठणे,
वैद्यकीय अधिकारी, खुंटेफळ.
...
सॅनिटायझर, मास्क वापरावे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सामाजिक अंतर ठेवावे. वैयक्तिक स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे.
- सुनीता वेडे, ग्रामसेविका, साबलखेड