गेवराई : शहरापासून जवळच असलेल्या कोल्हेर शिवारातील कालव्यात शहरातील संजय नगर भागातील चार ते पाच मुळे मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एक 14 वर्षीय मुलगा कालव्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. ऋषिकेश डिगंबर शेवाळे असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.
संजय नगर येथील ऋषिकेश शेवाळे हा इयत्ता 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो आज सकाळी आपल्या मित्रांसोबत कोल्हेर शिवारातील कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहता येत नसतानाही तो सर्वांसोबत पाण्यात उतरला. मात्र, कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ऋषिकेश वाहून गेला. ही माहिती सोबतच्या मित्रांनी त्याच्या घरी दिली. त्यानंतर ऋषिकेशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम सुरू केली. कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दुपारी 3 पर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. दुपारी 3 पर्यंत घटनास्थळी पोलिस व महसुलचे कोणीही फिरकले नव्हते.