माजलगाव : येथील माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी नगरपालिकेचे कर्मचारी शिवहर शेटे यांना १५ लाखांची खंडणी मागितली. तसेच धमकी देऊन फसवणुक केल्या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव नगरपालिकेचे नामांतर विभाग प्रमुख शिवहर चनबसअप्पा शेटे यांना १४ फेब्रुवारी २०१९ रोजी नगरपालिकेत शेख मंजूर हे गेले. तेथे त्यांनी शेटे यांना काही कामे करण्यास सांगितले. नियमात बसत असेल तरच काम करेल असे सांगताच मंजूर यांनी हुज्जत घातली. तू सामान्य कर्मचारी आहे, तुझी वाट लावतो. माझे न ऐकल्यास तुला जीवे मारील, अशी धमकी दिली. याचवेळी तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी दोघांनाही बोलवुन घेतले. चाऊस यांच्यासमोरही हा माझे काम कसे करीत नाही, असे म्हणत काटा काढील. त्याला सस्पेंड करील, त्याच्या तक्रारी करीन अन्यथा मला पंधरा लाख रुपये देण्यास सांगा, अशी धमकी मंजूर यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, शेख मजुर यांनी शेटे यांच्या वेगवेगळ्या तक्रारी करून त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे परिवार भयभीत झाला होता. त्यानंतर मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ४ जुलै २०२३ बोलून घेतले व पुरावे देण्यास सांगितले. त्यानंतर आपण सर्व पुरावे पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात शेख मंजूरविरोधात गुन्हा दाखल केल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.