कडा /आष्टी : तालुक्यातील कारखेल ब्रुद्रुक येथे शेतकऱ्याने सर्वे नं .८६ मधील शेतात गांजाची लागवड केल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. अंभोरा पोलिसांनी शेतात धाड टाकून १६ किलो गांजा जप्त केला आहे. सचिन साहेबराव जाधव असे शेतकऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील कारखेल ब्रुद्रुक येथील सचिन साहेबराव जाधव याने शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री जाधव याच्या कारखेल शिवारात सर्वे नं .८६ मध्ये शेतात धाड टाकली. यावेळी जाधव याच्या घराला लागून असलेल्या शेतातच गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी १६ किलो ८०० ग्रॅम वजनाचा जवळपास १ लाख ६८ हजार ३०० रूपयाचा गांजा जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या फिर्यादी वरून एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे , पोउपनि राहुल लोखंडे, पोना. पी.व्ही.देवडे , पोना. के.बी.राठोड , पोशि ए.सी.बोडखे , चालक पो.शि.शौकत शेख यांनी केली.