- अनिल महाजन
धारूर ( बीड) : पाणी फांउडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरीय तपासणीसाठी राज्यातील १६ गावे पात्र झाली असून यात मराठवाड्यातील पाच गावांचा समावेश आहे. लवकरच या गावाची राज्यस्तरीय स्पर्धेच्या पथकाकडून तपासणी होणार असून यामधूनच पाणीदार गावाची निवड होईल.
पाणी फांउडेशनच्या तिसऱ्या वॉटरकप स्पर्धेत ७५ तालुक्यांचा व राज्यातील दोन हजारांपेक्षा जास्त गावांचा समावेश होता. या गावांनी ८ एप्रील ते २२ मे या कालावधीत जलबचतीचे काम केले. स्पर्धा सुरू होताच १३ मुद्यांचे गुणांकन व मोजमाप करण्यात आले. नंतर तपासणी करण्यात आली.त्यानंतर तालुकास्तरीय पथकाकडून दोनशेच्या आसपास गावांची तपासणी झाली. यामधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १६ गावांची निवड झाली असून यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी पाच तर उत्तर महाराष्ट्रातील एक गावांची निवड झाली होती.
मराठवाड्यातील निवड झालेल्या पाच गावांत बीड जिल्ह्यातील तीन गावांचा समावेश आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील करंजी व आनंदवाडी, केज तालुक्यातील दीपेवडगावचा समावेश आहे. उर्वरित दोन गावांत औसा तालुक्यातील एकंबेवाडी आणि परंडा तालुक्यातील लंगोटवाडी या गावाचा समावेश आहे. राज्यस्तरीय तीन सदस्यीय तपासणी पथकाकडून लवकरच या गावांची तपासणी होणार आहे.
मराठवाडा पाणीदार होणारवॉटरकपच्या तिसऱ्या स्पर्धेत मराठवाड्यात उत्कृष्ट काम झाले असून ही जलबचतीची लोकचळवळ होत आहे. मराठवाडा हा दुष्काळावर मात करत असून अनेक गावे पाणीदार होत आहेत, अशी माहिती पाणी फांउडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांनी दिली.