अंबाजोगाई (बीड) : सायकल शिकविण्याचे आमिष दाखवून लहान मुलावर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस दोषी ठरवून १७ वर्षे सश्रम कारावास व २२ हजार रुपये दंड, अशी शिक्षा अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी शनिवारी ठोठावली. अमजद खॉं मुसा खॉं पठाण(२५, रा.परळी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची हकीकत अशी की, परळी येथील अमजद खॉं मुसा खॉं पठाण व आणखी एक अल्पवयीन आरोपीने एका मुलास, तुला सायकल शिकवतो व पैसे देतो असे आमिष दाखवून शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच पिडीत मुलास मारहाण करत याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत मुलाच्या पालकाच्या तक्रारीवरून अमजद खॉं मुसा खॉं पठाण व अल्पवयीन आरोपीविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात कलम ३७७,३२३,५०४,३४ भादवि व बाल लैंगिक अत्याचार कायद्या नुसार गुन्हा नोंद झाला. या प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध बाल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमजद खॉं मुसा खॉं पठाण यास अटक केली. त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हे प्रकरण अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले. सरकारी वकील अँड अशोक कुलकर्णी यांनी सहा साक्षीदार तपासले व ठोस पुरावे सादर केले. सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत १७ वर्षे सश्रम कारावास व २२ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी अँड.अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना अँड नितीन पूजदेकर यांनी सहकार्य केले.