बीड : कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच शनिवारपासून १८ ते ४५ वर्ष वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. परंतु या वयोगटासाठी केवळ साडेसात हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यात केवळ पाच केंद्रांवर प्रत्येकी २०० प्रमाणे १ हजार डोस दिले जाणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन वेळ घ्यावा लागणार आहे. थेट केंद्रावर जाऊन लस मिळणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे नागरिकांचे तर हाल होणारच आहेत शिवाय लसीकरण पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज हजारीपार जात आहे. शुक्रवारी तर उच्चांक गाठत दीड हजार पार केला. तसेच मृत्यूही वाढत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी शासनाकडून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर्स, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वच, तर आता चौथ्या टप्प्यात १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याची घोषणा झाली; परंतु मागील काही दिवसांपासून लसीचा प्रचंड तुडवडा जाणवत आहे. अगोदरचे ४५वर्षांवरील जवळपास ७ लाख लाभार्थ्यांना लस मिळालेली नाही. रोज केंद्रावर जाऊन ते रिकाम्या हाताने परतत आहेत. त्यामुळे हाल होत आहेत. आता शनिवारपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे; परंतु बीड जिल्ह्याला केवळ ७ हजार ५०० डोस आले आहेत. यातही पाच केंद्रांवर प्रत्येकी २०० प्रमाणे हजार डोस दिले जाणार आहेत. त्यामुळे दिवसभरात केवळ हजारच लाभार्थ्यांना लस मिळणार आहे. विशेष म्हणजे ही लस घेण्यासाठी अगोदरच कोविन ॲपवरून ऑनलाईन वेळ घ्यावा लागणार आहे. थेट केंद्रावर जाऊन लस मिळणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
या पाच केंद्रांवर मिळेल लस
१८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यासाठी पाच केंद्र तयार केले आहेत. यात जिल्हा रुग्णालय बीड, स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई, उपजिल्हा रुग्णालय परळी व गेवराई आणि ग्रामीण रुग्णालय आष्टीचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर २०० डोस दिले जातील. वेळ घेऊन लाभार्थी आले नाहीत तर त्यांचा डोस शिल्लक राहील. त्यांना पुन्हा वेळ घ्यावा लागणार आहे.
४५ वर्षांवरील लोकांसाठी १० हजार डोस
अगोदरच ४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जात आहे. या वयोगटासाठी बुधवारी रात्री १० हजार डोस आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राला १२०, तर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाला २०० डोस दिलेले आहेत. गुरुवारी यातील जवळपास ५ हजार डोस संपले आहेत. आता या लोकांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर लस दिली जाणार आहे. यांना ऑनलाईन वेळ घेण्याची गरज नाही.
जिल्ह्यात १४ लाख लाभार्थी
१८ ते ४५ वर्षे वयोगटातील जिल्ह्यात १४ लाख लाभार्थी आहेत. आलेले साडेसात हजार डोस केवळ सात दिवस पुरतील; परंतु एवढ्या संथगतीने लसीकरण चालत राहिले तर वर्ष लागणार आहे. त्यासाठी केंद्र वाढविण्यासह लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
...
१८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ७५०० डोस आले आहेत. पाच केंद्रांवर रोज एक हजार डोस दिले जातील. यासाठीही ऑनलाईन वेळ घ्यावी लागेल. थेट केंद्रावर लस मिळणार नाही. ४५ वर्षांवरील लोकांनी मात्र नेहमीप्रमाणे जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लसीची मागणी केलेली असून उपलब्ध होताच ती शासनाकडून येईल.
-डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड.