बीड : जिल्हा रूग्णालयात आता नव्याने १८ खाटांचे सुसज्ज व सुविधायुक्त असा अति दक्षता विभाग (आयसीयू) उभारला जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर याची सुरूवात होणार आहे. या आयसीयूमुळे रूग्णांचे हाल कमी होऊन आर्थिक भूर्दंडही टळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
३२० खाटांच्या जिल्हा रूग्णालयात दररोज दीड हजार रूग्ण तपासणी व उपचार घेतात. ६०० हून अधिक रूग्ण येथे अॅडमिट असतात. त्यातच १० ते १५ रूग्ण अतिगंभीर असतात. त्यांना अतिदक्षता विभागाची अत्यंत गरज असते. मात्र सद्यस्थितीत केवळ सहाच बेडचे आयसीयू आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल होत होते. रूग्णालय प्रशासनाला अति गंभीर रूग्णांना नाईलाजास्तव दुसऱ्या रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात होता. यामध्ये खाजगी डॉक्टरांचे फावत होते. मात्र आता हे सर्व बंद होणार आहे.
रूग्णालयाच्या बाजुलाच असलेल्या तीन मजली इमारतीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आयसीयू कक्ष उभारला जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर याचे नारळ फोडले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. हे आयसीयू सुरू झाल्यानंरत सर्वसामान्यांचे त्रास कमी होणार आहेत.
खटोड प्रतिष्ठाणचा पुढाकारआयसीयूमध्ये बेड व गाद्या नसल्याने एवढ्या दिवस काम रखडले होते. मात्र स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाणने पुढाकार घेत जवळपास दोन लाख रूपयांचे साहित्य उपलब्ध करून दिले. सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या मदतीबद्दल गौतम खटोड यांचा रूग्णालय प्रशासनाच्यावतीने सन्मान केला जाणार आहे. खा.प्रीतम मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मॉनीटरसाठी प्रयत्न सुरू१८ खाटांसाठी १८ मॉनिटर (यंत्र) आवश्यक आहेत. सध्या ते उपलब्ध नसले तरी ते उपलब्ध करून घेण्यासाठी रूग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी खा.प्रीतम मुंडे रूग्णालयाची पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान रूग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे मॉनिटरची मागणी करणे अपेक्षित आहे. खा.मुंडे यांनीही रूग्णालयासाठी आवश्यक निधी आपल्या फंडातून द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
सर्व सुविधांनी सुसज्ज तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर प्रसुती विभाग आणि दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर सर्जीकल व मेडिकल आयसीयू असणार आहे. सर्व सुविधा व सुसज्ज असे १८ बेडचे हे आयसीयू असेल. दसऱ्याला याची सुरूवात करण्याचा मानस आहे. गौतम खटोड यांनी साहित्य उपलब्ध करून दिल्याने मदत झाली.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड