बीड : नेकनूर, पेठबीड व बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पकडलेला तब्बल १८ लाख रूपयांचा गुटखा आज न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत १८ जुलै रोजी १५ लाख ६३ हजार रूपयांचा गुटखा बीड पोलिसांनी पकडला होता. त्यानंतर पेठबीडमधील भोईगल्लीमध्ये २ जुलै रोजी २ लाख ३० हजार रूपयांचा गुटखा एका घरात पकडला. तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतही एका ठिकाणी १३ हजार रूपयांचा गुटखा पकडण्यात आला होता.
हा सर्व गुटखा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळताच अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत हा गुटखा नष्ट केला. ही कारवाई प्रभारी सहायक आयुक्त एम.डी.शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ऋषीकेश मरेवार, अनिकेत भिसे, विजय कुलकर्णी, मुक्तार शेख यांनी केली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.