सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : जिल्ह्यातील ८ लाख कामगार राज्यासह परराज्यात ऊसतोडणीला जातात. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत २२० हंगामी वसतिगृह सुरू केली. यात २१ हजार ४९० मुले असल्याचा दावा शिक्षण विभाग करत आहे. परंतु कोल्हापूरच्या ‘अवनी’ संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांवर जाऊन सर्वेक्षण केले. तर ० ते १८ वयोगटातील तब्बल १८३९ मुले, मुली हे अंगणवाडी, शाळा सोडून उसाच्या फडात असल्याचे समोर आले आहे.
शिक्षण विभागाचा दावा फोल
राज्यात १९१ एवढे साखर कारखाने असून ३५ कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. सर्वेक्षणानंतर शाळाबाह्य आढळलेल्या मुलांची यादी बीडच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांना पाठविण्यात आली आहे. आता त्यांच्याकडून उलट तपासणी केली जात आहे. परंतु यानिमित्ताने शिक्षण विभागाचा दावा फोल ठरला आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अजूनही पूर्णपणे यशस्वी झाला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
२१ हजार मुलांचे स्थलांतर रोखले?
- जिल्हा परिषद विभागाने समग्र शिक्षाअंतर्गत बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या २१,४९० मुलांचे स्थलांतर रोखले आहे.
- त्यांच्यासाठी हंगामी वसतिगृहही सुरू केली. प्रत्यक्षात अजूनही कामगारांची मुले उसाच्या फडातच आहेत.
अवनी संस्थेने घेतलेल्या माहितीत १८३९ मुले ही पालकांसोबत होती. याची माहिती आमच्या संस्थेला पाठवली असून आता त्याची उलट तपासणी करत आहोत. काही ठिकाणी हेच विद्यार्थी शाळेत हजर आहेत. हाच प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. - तत्त्वशील कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड
हंगामी वसतिगृह आणि मुलांची यादी मागवून घेतो व त्यानंतर माहिती देतो. - भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बीड