बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दुसऱ्या बाजूला मृत्यूसत्र ही सुरुच आहे. मंगळवारी नव्या १५७ रुग्णांची भर पडली असून १९७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, २४ तासात पाच तर जुन्या १९ अशा २४ बळींची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली.
जिल्ह्यात सोमवारी २,६२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचे अहवाल मंगळवारी आले. यात १५७ जण बाधित आढळले तर २,४६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ७, आष्टी ३७, बीड २३, धारुर ४, गेवराई १३, केज २८, माजलगाव ९, परळी १४, पाटोदा ३, शिरुर ८ व वडवणी तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ८९ हजार ६४८ इतका झाला असून यापैकी ८५ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासात पाच तर जुन्या १९ अशा एकूण २४ मृत्यूची नोंद झाली. २४ तासातील पाच बळींमध्ये पाचेगाव (ता. गेवराई) येथील ८० वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील पाली येथील २८ वर्षीय पुरुष, वडगाव येथील ४७ वर्षीय महिला, गंगावाडी (ता.गेवराई) येथील ७० वर्षीय महिला व वडझरी (ता.पाटोदा) येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एकूण बळींचा आकडा २ हजार ३७० इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.