बीड : ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यासाठी २० कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून परळीतील एका डॉक्टरला २ कोटींना चुना लावल्याची घटना ३ नोव्हेंबरला समोर आली. तब्बल पाच वर्षांनंतर गुजरातच्या दहा जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
डॉ. रवींद्र माणिक गायकवाड (रा. वल्लभनगर, परळी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा परळीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासगी दवाखाना आहे. या दवाखान्याच्या विस्तारीकरणासाठी, तसेच सिटीस्कॅन, एमआरआय यंत्र खरेदीसाठी त्यांना कर्ज हवे होते. त्यासाठी त्यांनी विविध बँकांकडे प्रस्ताव दिला; परंतु कर्ज मिळाले नाही. कर्ज काढून देणाऱ्या काही खासगी संस्थांकडेही त्यांनी आपले प्रोफाइल दिले होते. त्यानुसार, २०१७ मध्ये त्यांना दिलावर वलीमहंमद कक्कल याचा कॉल आला. त्याने प्रोफाइलची माहिती घेत स्वत:च्या भुज कच्छ फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट पार्टनर या गुजरातेतील कंपनीकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. ४ डिसेंबर २०१७ रोजी तो उस्मान नोडे, शेख कासीमसह परळीला दवाखाना पाहण्यास आला होता. त्या रात्री त्यांनी बीडला शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला. तेथेच त्यांनी पहिल्यांदा पैसे स्वीकारले.
डिपॉझिट म्हणून उकळले दोन कोटी२० कोटींचे कर्ज देतो. त्यासाठी २ कोटी रुपये डिपॉझिट ठेवावे लागेल, अशी अट घातली. त्यामुळे डॉ. रवींद्र गायकवाड यांनी त्याच दिवशी त्यांना ४७ लाख रुपये अग्रिम दिले. ५ मार्च २०१८ रोजी गुजरातला जाऊन पुन्हा ४७ लाख रुपये दिले. कर्जाबाबत करार करण्याचा आग्रह धरल्यावर ३१ मे २०१८ रोजी त्यांना लोन ॲग्रिमेंटची नोटरी करून दिली. पुढे १६ नोव्हेंबर २०१८ रोजी डॉ. गायकवाड यांनी गुजरातला जाऊन पुन्हा २० लाख रुपये दिले. उर्वरित ८६ लाख रुपये २६ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले. दोन कोटी रुपयांच्या व्यवहाराचे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र केले. मात्र, नंतर कर्जासाठी वारंवार फोन वरून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. नंतर फोन उचलणेही बंद केले.
यांच्यावर गुन्हा दाखलफसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. रवींद्र गायकवाड यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दिलावर वलीमहंमद कक्कल, कासीम शेख, उस्मान नोडे, लियाकत ऊर्फ राजू पटेल, हाजी भाई, इब्राहिम शाह, रफिक शेख, राजू शेख, रामजी पटेल, हैर बचाऊ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पो.नि. केतन राठोड तपास करीत आहेत........