बीड : अवघ्या २० दिवसांचे बाळ. परंतु, संसर्ग झाल्याने तापेने फणफणले होते. माजलगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार केले. परंतु, त्यांनी ऐनवेळी हात वर केल्याने जिल्हा रुग्णालयाची वाट धरली. या बाळाची प्रकृती अतिशय नाजूक होती. परंतु, एसएनसीयू विभागातील डॉक्टर, परिचारिकांनी दिवसरात्र उपचार व काळजी घेतली. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत बाळ ठणठणीत झाले आणि आईच्या कुशीत गेले. बाळ जवळ येताच आईचेही डोळे पाणावले होते.
माजलगावमधील एका जोडप्याचे पहिलेचे बाळ होते. लक्ष्मीच्या रूपाने घरात मुलगी आल्याने सर्वच आनंदी हाेते. परंतु, काही दिवसांत तिची प्रकृती खालावत गेली. या बाळाला माजलगावमधीलच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. काही तास उपचार करून या खासगी डॉक्टरांनी त्याला तेथून रेफर केले. नातेवाइकांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. १० डिसेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता बाळ एसएनसीयू विभागात दाखल झाले. बाळ हातात पडताच डॉक्टरांनी उपचार, तर परिचारिकांनी काळजी घेण्यास सुरुवात केली. बाळाला ऑक्सिजन लावले. सलाईन व इतर औषधी देण्यास सुरुवात झाली. प्रत्येक तासाला परिचारिका बाळाची तपासणी करत होत्या. अखेर तिसऱ्या दिवशी बाळाचे ऑक्सिजन बंद करून त्याला आईचे दूध सुरू केले. पाचव्या दिवशी बाळ ठणठणीत होऊन वॉर्मरमध्येच खेळू लागले. अधूनमधून हास्य, तर कधी रडण्याचा आवाज आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य फुलले. एका बाळाला आपण जीवदान दिल्याचा आनंद सर्वच डॉक्टर, परिचारिकांना होता. शेवटी बुधवारी दुपारी या बाळाला सुटी देऊन आईच्या कुशीत देण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनीही सरकारी रुग्णालयातील उपचाराबद्दल समाधान व्यक्त केले.
या टीमने केले उपचारजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, मेट्रन रमा गिरी, सहायक संगीता महानोर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इलियास खान, डॉ. वर्धमान कोटेचा, डॉ. ऋषीकेश पानसंबळ, डॉ. मोहिनी जाधव, डॉ. दिबा खान, डॉ. रजनी मोटे, डॉ. शीतल चौधरी, इन्चार्ज सविता गायकवाड, सुलक्षणा जाधव, मोहोर डाके, अनिता मुंडे, आशा रसाळ, सय्यद रमीज, सारिका पाटोळे, शुभांगी शिंदे, पूजा बाेरगे, शीला टाटे, मुक्ता कदम, आरती कदम, योगेश्वरी मुंडे, पुष्पा माने या पथकाने बाळावर उपचार केले.