लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पावसाळा सुरु झाल्याने जलकुंभांच्या जलशुद्धीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुरु झाले आहे. या अभियानांतर्गत काही ठिकाणी तातडीने कामे सुरु झाली होती. लोकमतने याबाबत सविस्तर वृत्त दिल्यानंतर जिल्ह्यातील चार तालुक्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली, त्याचबरोबर त्या त्या तालुक्यातील जलकुंभाचे शुध्दीकरण करण्यास सुरु वात झाली.पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत वर्षभरात दोन वेळा पावसाळ्याआधी व नंतर शुद्धीकरण केले जाते. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षित हाताळणी व साठवणुकीसाठी ही मोहीम महत्वाची असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील ७५० जलकुंभांचे शुद्धीकरण हाती घेण्यात आले होते. या संदर्भात ७ जुलै रोजी लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. इतर ठिकाणी कामे सुरु झाल्याचे समजल्याने ज्या तालुक्यात ही मोहीम सुरु झाली नव्हती, त्या तालुक्यातील यंत्रणा जागी झाली. विस्तार अधिकारी आरोग्य, एमपीडब्ल्यू, पाणी गुणवत्ता विभागाचे कर्मचाऱ्यांनी धावपळ सुरु केली. ३०० जलरक्षक व ३०० आरोग्य कर्मचारी आदींनी जलकुंभ शुध्दीकरण हाती घेतले. जिल्ह्यातील शिरुर कासार, पाटोदा, आष्टी, माजलगाव तालुक्यात ही कामे सुरु झाली दोन दिवसात जवळपास २०० जलकुंभांचे शुद्धीकरण करण्यात आले. यात क्लोरिनचा वापर करण्यात आला. आधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ब्लिचिंग पावडरचा पुरवठा होत होता. काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना स्वत:च्या उत्पन्नातून ब्लिचिंग पावडर विकत घ्यावी लागते. रविवारी ‘लोकमत’ मधील वृत्तानंतर ग्रामपंचायतींनीही तातडीने ब्लिचिंग पावडर खरेदी केली. बंद जलकुंभाचे शुद्धीकरण झाले.
रेंगाळलेल्या २०० जलकुंभ शुद्धीकरणाला येऊ लागला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:32 AM