बीड : राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, असे असले तरी रापमच्या बसमधील चालक, वाहकांसह प्रवासीसुद्धा अद्यापही असुरक्षित आहेत. जिल्ह्यातील २०७८ चालक, वाहकांचा दररोज ८५ प्रवाशांशी संपर्क येत आहे तसेच फेरी करून आलेल्या बसेसचेही नियमित निर्जंतुकीकरण केले जात नसल्याने आणखीनच कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
२०२० हे वर्ष पूर्ण लॉकडाऊनमध्ये गेले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जागेवरच होता. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाला. चालक, वाहकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही वेतनासाठी भांडावे लागले. आता लॉकडाऊन उघडले आणि लालपरी सुरळीत धावू लागली. प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याने रापमच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे दिसते. असे असले तरी कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. मागील आठवड्यापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रापमकडून चालक, वाहकांसह प्रवाशांना काळजी घेण्याबाबत आवाहन केले जात असले तरी कोरोनाचे नियम १०० टक्के पाळले जात नसल्याचे दिसते. त्याच रापममधील १ हजार १११ वाहक आणि ९६७ चालकांचा दररोज सरासरीनुसार रोज ८५ हजार प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेण्यासह बसेस परतल्यावर त्यांनाही सॅनिटाईज करून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ना चाचणी, ना क्वारंटाईन
बीड विभागातील बसेस मुंबई, पुणे, वर्धा, अमरावती अशा हॉटस्पॉट भागात जातात. त्यामुळे येथून परतल्यावर चालक, वाहकांची कोरोना चाचणी करणे अपेक्षित आहे. यामुळे त्यांच्यासह त्यांचे कुटुंब कोरोनापासून सुरक्षित राहील; परंतु या चाचण्याच केल्या जात नाहीत. केवळ मुंबई बेस्टसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्याच चाचण्या केल्या जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोना लसीची प्रतीक्षा
कोरोनाकाळात १०० टक्के नसले तरी काही चालक, वाहकांनी परजिल्हा, परप्रांतीय लोकांना बसने नेऊन सोडण्याचे काम केलेले आहे, असे असले तरी त्यांना अद्याप कोरोना लस दिलेली नाही. मागील काही महिन्यांपासून चालक, वाहकांसह अनेक कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यांनाही लस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चालक, वाहकांचा बोलण्यास नकार
बीड बसस्थानकात जावून याबाबत काही चालक, वाहकांना बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु आपण माध्यमांशी बोलल्यावर रापम प्रशासन आपल्यावर कारवाई करेल, या भीतीने अनेकांनी बोलण्यास नकार दिला. परंतु कोरोना लस द्यावी, चाचणीही करावी, अशी मागणी त्यांनी केली. रापमकडून मास्क, सॅनिटायझर दिले जात नसल्याचीही खंत एकाने व्यक्त केली.
अशी आहे आकडेवारी
चालक मंजूर - ९६७
चालक रिक्त - ८३
वाहक मंजूर - १०२८
कार्यरत वाहक - ११११
बदलून आलेले - ८३