बीड : स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी धडपडणाऱ्या बीड शहरातील युवकास यंत्रसामुग्री पुरविणे आणि भागीदारीचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिक कुटुंबाने २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अक्षय अजय खरवडकर (रा. बार्शी रोड, बीड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१६ साली बीड येथे स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी अक्षय प्रयत्नशील होता. त्यासंदर्भाने इंटरनेटवर शोध घेताना त्याला पुण्यातील ‘भारत बायोडिझेल’ नामक कंपनी बायोडिझेल उत्पादन करण्याची यंत्रसामुग्री तयार करून त्याचा कारखानाही उभा करून देतात, अशी माहिती मिळाली. अक्षय आणि त्याचे वडील अजय यांनी सदर कंपनीचा मालक सागर प्रताप देशमुख, प्रताप पंढरीनाथ देशमुख आणि सुनीता प्रताप देशमुख यांच्याशी संपर्क साधला. प्रस्तावित उद्योग उभारणीसाठी ४७ लाखांचा खर्च अपेक्षित असून, केवळ तुमच्यासाठी आम्ही तो ३७ लाखांत उभारून देऊ, असे आमिष देशमुख कुटुंबियांनी दाखविले. सोबतच कंपनीचे आकर्षक माहितीपत्र दिले आणि बीड येथील उद्योगात भागीदार होण्याचा प्रस्ताव देखील सागरने दिले. या सर्व भूलथापांना बळी पडून खरवडकर यांनी त्याच वर्षी एप्रिल ते जून महिन्यात तीन टप्प्यांत एकूण १७ लाख रुपये देशमुखला दिले. त्यानंतर पाच-सहा महिने उलटूनही यंत्रसामुग्री येत नसल्याने खरवडकर यांनी देशमुखकडे तगादा लावला. त्यावर यंत्रसामुग्री येण्यास खूप वेळ लागणार असल्याचे देशमुखने सांगितले आणि असून तोपर्यंत सातारा येथील एक बंद पडलेला बायोडिझेलचा कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्यासाठी खरवडकर यांना भाग पाडले. साताऱ्याच्या कारखान्यात गुंतवणूक करण्यासाठी खरवडकर यांनी तगादा लावून देशमुखकडे दिलेल्या रकमेतून सहा लाख रुपये घेतले. परंतु, कच्च्या मालासाठी म्हणून खरवडकर यांच्याकडून पुन्हा दहा लाख रुपये घेण्यात आले. मात्र, खरवडकर यांना कच्चा माल मिळालाच नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना सातारा येथील कारखाना बंद करावा लागला. हताश झालेल्या खरवडकर पिता-पुत्रांनी देशमुखकडे दिलेल्या २१ लाखांच्या रकमेची वारंवार मागणी केली. परंतु, काही दिवसातच यंत्रसामुग्री देण्याचे आश्वासन देत तो टाळाटाळ करत राहिला. त्यामुळे त्यांनी पुणे येथे जाऊन ‘भारत बायोडिझेल’ कारखाना परिसरात जाऊन चौकशी केली असता सदरील कारखाना २०१५ सालीच बंद पडल्याची माहिती त्यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अजय प्रभाकरराव खरवडकर यांनी रविवारी बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सागर, प्रताप आणि सुनीता देशमुख यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उद्योगासाठी यंत्रसामुग्री पुरविण्याच्या बहाण्याने बीडच्या तरुणाला २१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:42 PM
स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी धडपडणाऱ्या बीड शहरातील युवकास यंत्रसामुग्री पुरविणे आणि भागीदारीचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिक कुटुंबाने २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देपुण्यातील कंपनीच्या मालकासह आई-वडिलांवर गुन्हा