लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्यातच नुकताच १८ ते ४४ वयोगटाला पहिला डोस देणे बंद करण्यात आले आहे. असे असले तरी हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्समधील लोकांना अद्यापही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. प्रतीक्षेत असलेल्या कोरोनायाेद्धयांची संख्या २१ हजार ९९५ एवढी असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला डोस न घेतल्याने आता रांगेत उभे राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आरोग्य कर्मी, पोलीस, महसूल, नगरपालिका आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा समजून कोरोना लस देण्यास पहिले प्राधान्य दिले होते. परंतु सुरुवातीच्या काळात लसीबद्दल अनेक गैरसमज मनात असल्याने ते लस घेण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळेच आज या सर्वांना पहिला डोस घेतल्यानंतरही केवळ लसीचा तुटवडा असल्याने प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या योद्धाना लस घेण्याची कसलीही स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे सामान्यांप्रमाणेच रांगेत उभे राहण्याची वेळ या सर्वांवर आली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख १० हजार लोकांनी कोरोना लस घेतली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आगोदर दुर्लक्ष, आता पश्चाताप
० जिल्ह्यात सुरुवातीपासूनच हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. परंतु बहुतांश लोकांनी याकडे दुर्लक्ष केले.
० आता जिल्ह्यात सध्या सर्वत्रच लसीचा तुटवडा आहे. तसेच आलेले डोस घेण्यासाठी सामान्य लोकही गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे रांगेत उभे राहावे लागत असून सुरुवातीला लस न घेतल्याचा पश्चाताप होत आहे.