लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : केज तालुक्यातील लाडेगाव येथील मागासवर्गीय गायरानधारकांच्या ५० एकर शेतजमिनीवर तणनाशक फवारणी करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी २२ गायरानधारक मंगळवारपासून येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता.
यासंदर्भात गायरान हक्क अभियानच्यावतीने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना निवेदन देण्यात आले आहे. या बेमुदत उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला. लाडेगाव येथील सरकारी जमीन गट नं.१४३ मधील अतिक्रमणधारकांच्या वहिती केलेल्या उभ्या पिकांवर तणनाशक फवारणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवावेत, या पिकांची नुकसानभरपाई समाजकल्याण विभागामार्फत तात्काळ देण्यात यावी, ॲट्रॉसिटीला काऊंटर करण्यासाठी म्हणून खोटा दरोड्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादी व फौजदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
उपोषणास लाडेगाव येथील गायरानधारक मोहन धीरे, परसराम धीरे, विजयमाला नवगिरे, मधुकर नवगिरे, बालू धीरे, भिवा धीरे, काविरा धीरे, वचिष्ट धीरे यांच्यासह अनेक गायरानधारक बसले आहेत. गायरान हक्क अभियानाचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. विलास लोखंडे, राष्ट्रीय सचिव बन्सी गायसमुद्रे, वंचित बहुजन आघाडीचे गोविंद मस्के, वंचितचे तालुका महासचिव उमेश शिंदे यांनीही उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
180821\img-20210818-wa0070.jpg
गायरान धारकांचे उपोषण सुरू