शिरूर कासार : इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्या अनुषंगाने शिक्षकांची कोरोना तपासणी सुरू आहे. शुक्रवार व शनिवारी दोन दिवसांत २०४ शिक्षकांनी तपासणी करून घेतली. त्यात २२ शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती गटशिक्षण कार्यालयाकडून देण्यात आली. तालुक्यातील रायमोह, तागडगांव, पांगरी, शिरूरकन्या शाळा, मानुर व जाटनांदूर या सहा केंद्रांतील २०४ शिक्षकांची तपासणी करण्यात आली, पैकी २२ शिक्षक हे पाॅझिटिव्ह निघाले आहेत. बारा केंद्रांतर्गत ४०५ शिक्षक असून, २०४ शिक्षकांची तपासणी झाली. उर्वरित हिवरसिंगा, खालापुरी, आर्वी, तिंतरवणी, फुलसांगवी व गोमळवाडा केंद्रातील शिक्षकांची आणखी होणार असल्याचे सांगितले. शाळा सुरू होणार असल्याने, मुलांच्या व शिक्षकांच्या सुरक्षेसाठी कोरोना चाचणी आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात असल्याचे गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी सांगितले.
दोन दिवसांत २२ शिक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:16 AM