- नितीन कांबळे कडा (बीड): नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून आहे. यातील नगर ते आष्टी दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेसेवा नियमित सुरु होण्यासाठी आता २३ सप्टेंबरच्या मुहूर्त लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वेमंत्री आदी मान्यवरांच्या उपस्थिती रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासूनची बीड जिल्हावासीयांची रेल्वेची प्रतिक्षा आता संपली आहे. नगर ते आष्टी या ६१ किमीचा रेल्वे मार्ग तयार झाला आहे. यावर हायस्पीड इंजिनची चाचणी देखील झाली आहे. रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत एका कार्यक्रमात रेल्वेसेवा फेब्रुवारीमध्ये सुरु होईल अशी घोषणा केली होती. मात्र, तेव्हा सेवा सुरु झाली नाही. अखेर आता येत्या २३ सप्टेंबरपासून आष्टी ते नगर ही रेल्वे नियमित धावणार आहे. यासाठी जंगी सोहळा आयोजनाच्या तयारी सुरु आहे. याच्या कार्यक्रम पत्रिका देखील तयार झाल्या असल्याची माहिती आहे.
नगर ते आष्टी असा ६१ किलोमीटर अंतरावरील काम पूर्ण झाले आहे. रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी झाली आहे. आता रेल्वे धावण्यास कसलीच अडचण नाही. यामुळे आष्टी ते नगर नियमित रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने नगर येथील रेल्वेस्थानक देखील सज्ज झाले आहे.
आष्टी येथे होणार भव्य उद्घाटन सोहळानगर ते आष्टी ही पॅसेंजर रेल्वे २३ सप्टेंबर रोजी डेमोसहित नियमित सुरू होणार आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. प्रीतम मुंडे, खा. डाॅ.सुजय विखे, आमदार, नगरचे महापौर, आष्टीचे नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत होईल.