अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. एप्रिलच्या पंधरा दिवसात कोरोनाचे २३७६ रुग्ण निष्पन्न झाले आहेत, तर आतापर्यंत अंबाजोगाई तालुक्यात ६६५५ इतके रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात रुग्णाला बेड मिळवण्यासाठी नातेवाइकांची दमछाक होऊ लागली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही जाणवू लागला आहे. धोका वाढला तरी नागरिकांना अजूनही गांभीर्य नसल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत अंबाजोगाई तालुका बीड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनावर मोठा ताण आणला आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. कुटुंबातील एखादा रुग्ण कोरोनाबाधित निघाल्यानंतर त्या कुटुंबातील व्यक्तींना आपल्या रुग्णाला रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी मोठी दमछाक करावी लागत आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. अशाही स्थितीत अंबाजोगाई शहरात रस्त्यावरील गर्दी कमी व्हायला तयार नाही. जोपर्यंत पोलीस प्रशासन व नेमलेले पथक रस्त्यावर असते, तोपर्यंत गर्दी कमी होते. हे पोलीस पथक पुढे सरकरले की पुन्हा जैसे थे स्थिती होते. लोकांच्या या बेफिकिरीमुळे संसर्गाचा धोका कायम आहे.
मास्क न वापरणाऱ्या २५ जणांना दंड
अंबाजोगाई शहरात महसूल व पोलीस प्रशासन रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांना व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. गुरुवारी शहरातील २५ जणांवर अशी कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अद्यापही शहरात ही कारवाई सुरूच आहे.
रेमडेसिविरचा तुटवडा
अंबाजोगाई व परिसरातील रुग्ण लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. शुक्रवारी कोविड केअर सेंटरमध्ये रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना शुक्रवारचा डोस देण्यात आला नव्हता. इंजेक्शनच्या पाठपुराव्यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. रात्रीपर्यंत हे इंजेक्शन उपलब्ध होतील. असे त्यांनी लोकमतला सांगितले.
विनाकारण बाहेर पडाल, तर कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधाची जनतेने अंमलबजावणी करावी, शासनाने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवावगळता सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होईल. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवरही पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नागरिक सांगूनही जर घराबाहेर पडत असतील तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांनी दिला आहे.
===Photopath===
160421\20210416_141005_14.jpg