अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दीड महिन्यात कमी झालेली रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाचे एकूण २४ रूग्ण आढळले आहेत. मंगळवारी तालुक्यात एकूण १० पैकी अंबाजोगाई शहरात ८ रुग्ण निष्पन्न झाले. तर बुधवारी ११ आणि गुरूवारी ३ रूग्ण आढळल्याने धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
एप्रिल व मे महिन्यात अंबाजोगाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. अंबाजोगाई तालुक्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. तालुक्यात आजपर्यंत १३ हजार ८६३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शहरात नवीन व सहवासितांची रुग्णांच्या संख्येत भरच पडू लागली आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात अजूनही रुग्णांवर उपचार सुरूच आहेत.
सार्वजनिक ठिकाणी नेहमी गर्दी
अशा स्थितीत ही शहरवासीयांना कोरोनाचे गांभीर्य नाही. शहरात सार्वजनिक ठिकाणी अजूनही गर्दी कायम आहे. शासनाने बाजार बंद केले असले तरी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे विक्रेते कसल्याही प्रकारचे बंधन पाळत नसल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. शासनाने विनामास्क फिरणाऱ्यांकडून हजारो रुपये दंड वसूल केला तरी परिस्थिती ‘जैसे थे’ च होऊ लागली आहे. अशी स्थिती राहिली तर अंबाजोगाई शहर बंद ठेवण्याचा पर्याय शासनासमोर राहणार आहे.
त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष
ग्राहक, व्यापाऱ्यांचे मास्क वापराकडे दुर्लक्ष होत असल्याने अंबाजोगाई शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे पालन व्यापारी व ग्राहकांकडून होत नाही. मास्कच्या वापराकडे कमालीचे दुर्लक्ष केले जाते. सामाजिक अंतर पाळले जात नाही. कोरोनाबाबतची त्रिसूत्री पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
तर कायदेशीर कारवाई
शहरातील नागरिकांनी वेळीच गांभीर्य ओळखून कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. नसता मास्क न वापरणाऱ्या, शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिला आहे.