किल्लेधारूर (बीड): धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे नेते महादेव तोंडे यांचे चिरंजीव मंगेश महादेव तोंडे यांची वयाच्या 24 व्या वर्षी निवड करण्यात आली. मंगेश यांच्या निवडीने सर्वात तरुण सभापती बाजार समितीस मिळाला आहे. याचवेळी उपसभापतीपदी सुनील शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा नेते रमेशराव आडसकर, राजाभाऊ मुंडे व माजी नगराध्यक्ष भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या व्यूहरचनेमुळे धारूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यात पुन्हा यश मिळवले. 18 पैकी 17 संचालक निवडून आणत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. दरम्यान, आज सभापतीपदी मंगेश महादेव तोंडे यांची तर उपसभापती पदी सुनील भैरवनाथ शिनगारे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. एका २४ वर्षीय तरुणाला सभापतीपदी संधी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यात आनंद व्यक्त केला जात आहे.