वडवणी (जि. बीड) : विनयभंग प्रकरणी फिर्याद देणाऱ्या पीडित महिलेला अवघ्या २५ दिवसात न्याय मिळाला आहे. यातील गुन्हा दाखल होऊन तपासानंतर न्यायालयात जलदगतीने हे प्रकरण चालले. आरोप सिद्ध झाल्याने वाजेद हमीद शेख यास २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये एकत्रित दंड वडवणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफले यांच्या न्यायालयाने सुनावला. २५ दिवसात निकाल लागणारे हे बहुधा पहिलेच प्रकरण असावे.
शहरातील एका ३५ वर्षीय महिला १४ जानेवारी सकाळी घरात पाण्याची मोटार उचलत असताना त्या ठिकाणी वाजेद हमीद शेख याने नातेसंबंध सांगत ‘तू माझ्यासोबत चल’ असे म्हणत विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी वाजेद हमीद शेख विरोधात गु.र.नं. ०५/२०१९, कलम ३५४ (ब), ३५४ (अ), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार सी. के. माळी यांनी आरोपीस अवघ्या दोन दिवसात अटक करून कोर्टात हजर केले. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली. १८ जानेवारी रोजी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फेसरकारी वकील एस. एच. जाधव यांनी पाच साक्षीदार तपासले. निकालाअंती आरोपी वाजेद हमीद शेख यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफले यांनी दोन कलमाअंतर्गत दोष सिध्द होऊन आरोपीस २ वर्षे सक्तमजुरी व १० हजार एकत्रित दंड सुनावला. या प्रकरणात कोर्ट पैरवी व सहायक म्हणून पोलीस कर्मचारी सुभाष गडदे आणि दिलीप सानप यांनी काम पाहिले.
अंडरट्रायल चालले प्रकरणगुन्हा घडल्यानंतर पोलीस व सरकारी वकिलांनी हे प्रकरण जलदगतीने चालावे या दृष्टीने कार्यवाही केली. त्यामुळे हे प्रकरण अंडरट्रायल चालले. या प्रकरणातील फिर्यादी पीडित महिला, तिचा पती, सासरा, तपासी पोलीस अधिकारी व पंच यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. ८ फेब्रुवारी रोजी न्या. के. के. चाफले यांच्या न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.
१५ आॅगस्ट २००८ रोजी वडवणी तालुका न्यायालय अस्तित्वात आले. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होऊन आरोपीची अटक, न्यायालयात हजर करणे, न्यायालयात प्रकरण चालणे व दोषसिद्धीनंतर शिक्षा या सर्व प्रक्रिया २५ दिवसात झाल्या. असे पहिल्यांदाच झाले आहे.