बीड : केबीसी (कौन बनेगा करोडपती) नावाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून येथील एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी तब्बल २९ लाख २३ हजार रुपयांना गंडविले. २५ लाख रुपयांची लॉटरी, दुबईच्या आलिशान कारचे आमिष दाखवून तब्बल ३० टप्प्यांत ही रक्कम उकळण्यात आली. ३ मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मोहम्मद फहीमोद्दीन अब्दुल रहीम (५२, रा. झमझम कॉलनी, बीड) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी गेवराईत जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून ते बीडमध्ये इस्लामपुरा येथील नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ११ डिसेंबर २०२१ रोजी ते घरी होते. यावेळी अचानक त्यांना एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर अनोळखी व्यक्तीने समाविष्ट केले. केबीसी नावाच्या या ग्रुपवर एक व्हिडिओ शेअर केला गेला. ज्यात २५ लाखांची लॉटरी व आलिशान कार बक्षीस म्हणून दिल्याचे दाखविले होते. १३ डिसेंबर रोजी शिक्षक मोहम्मद रहीम यांनी संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. त्याने मोहम्मद यांना बोलण्यात गुंतवून ठेवत ३० टप्प्यांत प्रक्रिया शुल्क,
टॅक्स, जीएसटी, सेवाशुल्क, वाहतूक खर्च आदींच्या नावाखाली सुमारे २९ लाख २३ हजार रुपये उकळले. शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये मनीष कुमार, आकाश वर्मा यांच्यावर गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस निरीक्षक रवी सानप करत आहेत.
३१ व्या वेळी पैशांची मागणी केली अन्....
सायबर भामट्यांनी शिक्षक मोहम्मद रहीम यांना गोड बोलून स्वप्नांच्या दुनियेत नेले. त्यांच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या खात्यात ते पैसे भरत राहिले. कोणाला सांगू नका, दुबईहून कार येत आहे, असे सांगून कारचे फोटो पाठविले. त्यामुळे मोहम्मद रहीम यांची खात्री पटली. याचा फायदा घेत भामट्यांनी त्यांना लुबाडले. ३१ व्या वेळी पैशांची मागणी केल्यावर मात्र मोहम्मद रहीम हे भानावर आले व त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
१३ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात शिक्षकाकडून केबीसी लॉटरी व कारचे आमिष दाखवून २९ लाख रुपये उकळण्यात आले. केवळ आमिषाला भुलून ही फसवणूक झाली. कुठल्याही स्थितीत अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करून नागरिकांनी स्वत:ची फसगत करून घेऊ नये.- रवी सानप, पो.नि. शहर पोलीस ठाणे, बीड