लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सध्या कोरोना संशयित व बाधित रुग्णांची एचआरसीटी तपासणी केली जाते. त्यात येणाऱ्या स्कोअरवरून उपचाराची दिशा ठरविली जात आहे. परंतु एका २७ वर्षीय महिलेचे एचआरसीटी केले असता जिल्हा रुग्णालयात ३ स्कोअर आला. तर खासगीत १० आले. एकाच दिवसात एवढा स्कोअर वाढू शकत नाही. त्यामुळे यात खरे कोण आणि खोटे कोण, असा प्रश्न आहे. स्कोअरमधील तफावतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील एका २७ वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने २९ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. यात त्यांचा एचआरसीटी तपासणी केली होती. नोंदणी क्रमांक ५,०३५ हा होता. यात त्यांना ३ स्कोअर असल्याचा अहवाल देण्यात आला. याच महिलेने लगेच खासगी सिटी स्कॅन सेंटरवर जाऊन तपासणी केली. यात त्यांचा स्कोअर १० दाखविण्यात आला. विशेष म्हणजे या तपासणी अवघ्या काही तासांच्या अंतराने केल्या होत्या. एवढ्या वेळात इतका स्कोअर वाढू शकत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. हाच धागा पकडून वंचित बहुजन आघाडीने सर्व पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यात चौकशी करून कोण खरे आणि खोटे याचा शोध घेण्यासह दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वंचितचे अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी केली आहे. तसेच वेळीच यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
....
एकाच महिलेचा सरकारी आणि खासगीत एचआरसीटी केली असता तफावत आली. हे सर्व डॉक्टर आणि डायग्नोस्टिक सेंटरवाल्यांचे रॅकेट आहे. यात सामान्यांची लूट केली जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा नोंद करावा. अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
प्रा. शिवराज बांगर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, बीड,
...
आमच्याकडे संबंधित महिलेची एचआरसीटी २९ तारखेलाच झालेली आहे. यात तिचे स्कोअर ३ आहे.
- डॉ. संतोष जैन, जिल्हा रुग्णालय, बीड.
...
आमच्याकडे संबंधित महिलेचे एचआरसीटी केलेले असून त्याचा स्कोअर १० आहे आणि तो खात्रिशीर आहे. त्याचा व्हिडिओदेखील आहे. आमच्या रिपोर्टमध्ये पूर्ण नमूद केले आहे. त्याची फिल्म पण आम्ही सोबत दिली आहे. मी सोडून आणखी ४ तज्ज्ञांना ती दाखवावी. आणखी काही त्रुटी असतील तर त्या देखील सांगतो.
- डॉ. अरुण बडे, युनिक डायग्नोस्टिक सेंटर, बीड.