लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व बिंदूनामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कार्यमुक्त केले होते. दरम्यान शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सध्या तरी या शिक्षकांना कार्यरत ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.१७ नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर २७९ शिक्षकांनी उपोषण सुरु केले होते. दरम्यान याच दिवशी सायंकाळी त्यांना ग्रामविकास तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासित केले होते. मात्र त्यानंतर शासनाचे लेखी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला शाळा सुरु होऊनही २६ नोव्हेंबरपर्यंत मिळालेले नव्हते. त्यामुळे कार्यमुक्ती की स्थगिती याबाबत संभ्रम कायम होता.तर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी २७९ शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्हयात जाण्यासाठी कार्यमुक्त केले होते. सदोष बिंदूनामावलीचा आधार घेत हे आदेश दिल्याचा संदर्भ देत त्याविरूध्द शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे दाद मागितली होती. शिक्षकांच्या कार्यमुक्तीमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेवून यांनी ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत शिक्षक प्रतिनिधींची तातडीने बैठक घेवून कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मुंडे यांनी आदेश दिल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिका-यांना लेखी पत्र पाठवून त्या २७९ शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून आणि शिक्षकां अभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्यातरी या पदावर संबंधित शिक्षकांना कार्यरत ठेवण्यात यावे असेही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे हे शिक्षक सध्यातरी कार्यमुक्त होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. २७९ शिक्षकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.
‘ते’२७९ गुरुजीसध्या तरी बीडमध्ये कार्यरत राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:38 AM