लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रिक्त पदांबाबत नेहमीच्या डोकेदुखीमुळे आरोग्य विभागाने आता कंत्राटी पद्धतीवर तब्बल २९ एमबीबीएस डॉक्टरांची ११ महिन्यांसाठी भरती केली आहे. सात दिवसांत त्यांना रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयात सेवा बजावणार आहेत.जिल्हा रूग्णालयासह, उपजिल्हा, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ट्रॉमा केअरमध्ये डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त होती.उपलब्ध डॉक्टरांना रूग्णसेवा बजावताना अडचणी येत होत्या. त्यामुळे आरोग्य विभागाबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र रोष होता. एखादी दुर्दैवी घटना घडली की थेट हलगर्जीपणा आणि इतर आरोपांमुळे डॉक्टर दबावाखाली काम करत होते. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला. १६ जानेवारी रोजी अर्ज मागविले होते. अर्ज केलेल्या ४३ डॉक्टरांच्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डीएचओ डॉ.राधाकिशन पवार, आरएमओ डॉ.सतीश हरीदास यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. गुणांकन ठरविल्यानंतर सोमवारी त्यांचे समुपदेशन करून त्यांना रिक्त जागी रूजू होण्याचे आदेश मंगळवारी दिल्याचे आरएमओ डॉ.सतीश हरीदास यांनी सांगितले.हलगर्जी केल्यास कारवाईनियुक्त केलेल्या सर्व डॉक्टरांनी मुख्यालयी राहून रूग्णसेवा द्यायची आहे. कामचुकारपणा किंवा हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास येताच थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही कारवाई नवख्या डॉक्टरांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तत्पर कर्तव्य बजावण्याचे आव्हान या डॉक्टरांसमोर आहे.
बीडच्या आरोग्य विभागात २९ नवखे डॉक्टर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:55 AM