ऑनलाईन लोकमत
बीड : माजलगांव येथील केसापुरी वसाहत लगत असलेल्या पालामध्ये शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करत असतांना तीन कुपोषित बालके आढळून आली. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या मार्फत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना याची माहिती मिळताच त्यांनी याची तात्काळ दखल घेत आरोग्य विभागाला कामाला लावले आहे.
केसापुरी वसाहती लगत असलेल्या शाळाबाहय मुलांची माहिती घेत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांना एक मुलगी अपंग असल्याने तिला शाळेत येता येणार नाही अशी माहिती मिळाली. मात्र, प्रत्यक्ष त्या मुलीची भेट घेतली असता ती मुलगी अपंग नसुन कुपोषित असल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले. हि बाब त्यांनी आरोग्य विभागाला कळवली असता त्यांनी याची दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना दिली.
जिल्हाधिका-यांनी याची तात्काळ दखल घेवून संबंधीत यंत्रणेला विचारणा केली. यावर डॉ. दत्तात्रय पारगांवकर यांनी आज सकाळी पालाच्या ठिकाणी भेट देवून सदरील कुपोषित मुलगी प्रियंका उर्फ चिवळी राजाभाउ खरात ( २ वर्षे ) तसेच तिचे पालक यांना बीडला हलवले. तिथे तिच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहेत.
आणखी २ बालिका आढळल्या कुपोषित
पालावरील इतर बालकांची तपासणी केली असता साक्षी सुकदर खरात व संगीता दादाराव चव्हाण या दोन बालिकासुद्धा कुपोषित असल्याचे आढळुन आले.