अंबाजोगाई (बीड ): तालुक्यातील कुंबेफळ येथे आज मंगळवारी पहाटेपासून मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरु असून आतापर्यंत ३० पेक्षाही अधिक मेंढ्या दगावल्या आहेत. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्ल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून आणखी मेंढ्या दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाई येथील नारायण बाळू गवळी, किसन अंकुश चौरे, रामचंद्र व्यंकट गायके आणि कुंबेफळ येथील सुधाकर खंडू हेडे या चार मेंढपाळांनी त्यांच्या कळपातील एकूण ६०० मेंढ्या काल सायंकाळपासून कुंबेफळ येथील तळ्याच्या परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. यातील काही मेंढ्यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खराब झालेली कापसाची शेतातून उपटून बांधावर टाकलेली बोंडे आणि पाला खाल्ला. यानंतर आज मंगळवारी पहाटेपासून एकामागोमाग एक मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सूरु झाले.
आतापर्यंत ३० मेंढ्या दगावल्या असून शेकडो अत्यवस्थ आहेत. याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे, डॉ. गुट्टे, डॉ. अनिल केंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यावस्थ मेंढ्यांवर उपचार सुरु केले. परंतु, बाधित मेंढ्यांचे प्रमाण पाहता आणखी मेंढ्या दगावण्याची भीती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कुंबेफळ येथील प्रमोद भोसले, सुनील आडसूळ, प्रकाश तोडकर, अंकुश डीवरे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मेंढपाळा मदत केली. ३० पेक्षाही अधिक मेंढ्या दगावल्यामुळे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाल्याने मेंढपाळ आर्थिक संकटात सापडले आहेत.