बीड : चार वाहनांमधून कत्तलीसाठी जाणाºया ३० जनावरांची पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक क्रमांक १ ने गुरूवारी दुपारी सुटका केली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज येथील बाजारातून चार वाहनांमध्ये अक्षरश: कोंबून २६ गायी, दोन बैल व दोन वगार अशी ३० जनावरे बीडमधील कत्तलखान्याकडे आणली जात होती. पथक प्रमुख फौजदार कैलास लहाने यांना ही माहिती मिळाली. त्यांनी आपले कर्मचारी कामाला लावले.
पालीजवळ हे चारही वाहने आले असता त्यांना अडविले. त्यांची विचारपुस केली असता ही जनावरे कत्तलखान्याकडे जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर हे सर्व जनावरे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कैलास लहाने, पी. टी. चव्हाण, शिवदास घोलप, अनंत गिरी, संजय चव्हाण, जयराम उबे आदींनी केली.
जनावरांना झाल्या जखमाछोट्या वाहनांमध्ये जनावरांना अक्षरश: कोंबण्यात आले होते. तसेच इतरांना दिसू नये, यासाठी बाहेरून फळ्या लावून त्यावर ताडपत्री झाकण्यात आली होती. गतिरोधक व खड्डयांमध्ये वाहन आदळल्याने घर्षण होऊन जनावरांना मोठ्या जखमा झाल्या होत्या. त्यांची अवस्था पाहता क्षणीच अंगावर शहारे उभे रहात होते.