- शिरीष शिंदेबीड: गेवराई तालुक्यातील रुई गावात तब्बल १२०० एकर क्षेत्रावर तुती लागवड झाल्याने हे गाव देशात पहिल्या क्रमांकावर आले आहे. एवढेच नव्हे तर रुई गावात दर्जेदार रेशीम उत्पादित होत असून त्यातून महिन्याकाठी तब्बल तीन कोटीं रुपयांची तर वर्षाकाठी जवळपास ३० कोटींहून अधिक उलाढाल होत आहे.
दहा वर्षापूर्वी रूई गावामध्ये पाणीटंचाई खूप होती, आजही पाण्याची समस्या आहे. गावातील शेतकरी कापूस, गहू व तूर या पिकांशिवाय इतर पिके घेत नव्हते. काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेतले. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी रेशीम उद्याेगाचा ध्यास धरला. पाहता पाहता रई गावात रेशीम व्यवसाय वाढला असून आजघडीला या गावात जवळपास ४५० ते ५०० शेतकरी या व्यवसायात उतरले आहेत. गावातील ३५० शेतकऱ्यांनी पोखरा योजनेतर्गंत तर मनरेगा योजनेतर्गंत १०५ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे.
हिवाळ्यात असतो अधिक भावएक क्विंटल रेशीम कोषाला ८० ते ९० हजार रुपयांपर्यंतचा भाव शेतकऱ्यांना मिळालेला आहे. वातावरणानुसार कमी अधिक भाव असतो. सध्या दमट व ओलसर वातावरण असल्याने सध्या ५० ते ५५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. रेशीम कोष खरेदीचा भावात चढ-उतार चालूच असते, असे सांगण्यात आले.
३०० मजुरांच्या हाताला कामकापसाच्या जिनिंगला मजूर पुरवणारे गाव म्हणून रूई गावाची ओळख होती. आता गावातील शेतकरी रेशीम व्यवसायातून सधन झाले असल्याने अनेकांसाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. गावात आजच्या घडीला २५० ते ३०० मजूर कामाला असून पुरुषाला ६०० तर महिलेस ३५० रुपये मजुरी दिली जाते.
आता व्यापारीच येतात गावातपूर्वी गावातील शेतकरी बंगलोर येथे जाऊन रेशीम कोष विक्री करत असत, मात्र आता गावात उत्पादित होणारे रेशीम कोष उत्कृष्ट असल्याने बाहेर राज्यातून व्यापारी गावात येऊन रेशीम कोष खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांना बाहेर जिल्हा किंवा राज्यात रेशीम कोष नेऊन विकण्याचा त्रासही कमी झाला अन् जागेवर कोषाची खरेदी होत असल्याचा दुहेरी फायदा ग्रामस्थांचा होऊ लागला आहे.
आधी राज्यात , आता देशात पहिला क्रमांकगावाजवळ मोठे तळे नसल्याने पाणी समस्या कायम होती. ग्रामपंचायत ताब्यात आल्यानंतर प्रथमतः मनरेगातर्गंत कामे हाती घेतली. गावात टँकर चालायचे म्हणून मनरेगा योजनेतून आतापर्यंत ४८ शेततळ्यांची कामे झालेली आहे. आजच्या घडीला जवळपास ४५० ते ५०० शेतकरी रेशीम व्यवसाय करत असून सधन झाले आहेत. तुती लागवडीत माझे गाव राज्यात एक नंबर होते आता देशात पहिल्या क्रमाकांवर पोहोचले आहे. सध्या गावात १२०० एकरांवर तुतीची लागवड झाली असून रेशीम व्यवसायातून प्रतिमहिना तीन कोटींची उलाढाल होत आहे.- कालिदास नवले, सरपंच, रूई, ता. गेवराई.