बीड : मागासलेला जिल्हा अशी ओळख बीडची आहे. ती पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. अशाच ३० मुद्यांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यात जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पाणी, वीज, रस्ता, आरोग्य आदी मुद्यांची मांडणी केली.
सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी साठवण तलाव आणि बंधारे उभारल्यास शेतकरी स्वावलंबी आणि समाधानी होईल. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. शेतीमाल साठवण्यासाठी शासकीय शीतगृह उपलब्ध करून देण्यात यावेत. फळ संशोधन केंद्र उभारण्यात यावे. मंजूर झालेल्या सिताफळ संशोधन केंद्राला निधी आणि जास्तीचे अधिकार देण्यात यावेत. मत्स्य उद्योग भराभराटीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, अतिरिक्त ऊस गाळपासाठी नियोजन लावण्यात यावे नसता शेतकऱ्याना अनुदान देण्यात यावे. शेततळ्यांसाठी अनुदान वाढवावे, शेत तिथे रस्ता यासाठी जास्तीचा निधी द्यावा. बालाघाट डोंगरामध्ये सौर ऊर्जा, सोलार योजनेला प्रोत्साहन देण्यात यावे. वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात यावी. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अभ्यासासाठी मार्गदर्शन केंद्र आणि अत्याधुनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. आरोग्य सुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालयांची संख्या वाढवावी. जिल्हा शासकीय रुग्णालयात खाटांची संख्या अपुरी पडत आहे. २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, अजून १०० खाटांचे रुग्णालय याच ठिकाणी होणे आवश्यक आहे. नगर ते परळी रेल्वे मार्गाचे काम मंद गतीने आहे. राज्य सरकारने ठरलेला हिस्सा तातडीने देऊन या रेल्वे मार्गाला गतिमान करावे. कायमस्वरूपी पोलीस अधीक्षक देण्यात यावे. पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना आणि भाविकांना बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात यावे, आदी मुद्यांची मांडणी बीड शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केली. यातील बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले.
शिवसेनेचा सामाजिक प्रश्नांवर भर जिल्हाप्रमुखांची मुंबईत बैठक झाली आहे. यात आपण जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे असणारे प्रश्न व समस्यांचे ३० मुद्दे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. यातील बहुतांश मुद्दे साेडविण्याचे अश्वासनही दिले आहे. बीड जिल्हा शिवसेनेच्यावतीने सामाजिक प्रश्नांवर जास्त भर दिला जात आहे.- अनिल जगताप, जिल्हाप्रमुख शिवसेना