राम देशपांडेअकोला, दि. ४- ३0 व्या राज्य पक्षीमित्र संमेलनासाठी यंदा बीड जिल्हय़ातील अंबेजोगाई या शहराची निवड करण्यात आली आहे. ७ व ८ जानेवारी २0१७ रोजी होऊ घातलेल्या या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी अंबेजोगाई येथील येस या पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणार्या युवा संस्थेकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक व अमरावती येथील रहिवासी डॉ. जयंत वडतकर यांनी लोकमतला दिली. राज्यात आढळून येणार्या सर्व पक्ष्यांचा अभ्यास महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना करते. सर्व पक्ष्यांबद्दलची अद्ययावत व शास्त्रशुद्ध माहिती ठेवून त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केले जातात. पक्षी संवर्धनाबरोबरच पक्षीमित्र व अभ्यासक वाढविण्यावरसुद्धा या संस्थेचा भर असतो. या दृष्टिकोनातून संस्थेच्यावतीने १९८२ पासून राज्यात विविध ठिकाणी संमेलने आयोजित केली जात आहेत. संमेलनाच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित केले जातात. त्यामध्ये पक्ष्यांचे नवनवीन शोध व त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना यावर व्यापक चर्चा केली जाते. पक्षीमित्र संघटनेची बैठक महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, सावंतवाडी येथे जानेवारी २0१६ मध्ये झालेल्या २९ व्या संमेलनाचे माजी समेलनाध्यक्ष शरद आपटे, ३0 व्या संमेलनाचे समन्वयक डॉ. जयंत वडतकर, सदस्य डॉ. अनिल पिपळापुरे, प्रा. गजानन वाघ, केशर उपाध्ये आदींच्या उपस्थितीत नुकतीच अंबेजोगाई येथे पार पडली. या बैठकीत यंदाचे राज्य पक्षीमित्र संमेलन ७ व ८ जानेवारी २0१७ रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षी मित्रांची संख्या विचारात घेता, मराठवाड्यात ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. वडतकर यांनी सांगितले. गत ३५ वर्षांत मराठवाड्यात तीन राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलने पार पडली. यंदा अंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आलेले संमेलन हे चौथे राहणार आहे.
३0 वे राज्य पक्षीमित्र संमेलन जानेवारीमध्ये!
By admin | Published: August 04, 2016 11:56 PM