बीड : पटसंख्येच्या राज्यातील १,३१४ शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. लवकरच या शाळेतील १६९ विद्यार्थी व ६१ शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शाळेच्या जवळील दुस-या मोठ्या शाळेत समायोजन करताना विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या आत शाळा नसेल तर त्यांना अडचणी येणार आहेत.
इंग्लिश स्कुलचे फॅड शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही पसरल्याने जिल्हा परिषदेतील विद्यार्थी संख्या घटली आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या अनेक मराठी शाळांची पटसंख्या एका अंकावर येऊन पोहोचली आहे. यापार्श्वभूमिवर शिक्षण विभागाकडून ० ते १० मुलांची पटसंख्या असलेल्या राज्यातल्या ४,४२२ शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये १,३१४ शाळांचे स्थलांतरण जवळच्या शाळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यातील ३२ शाळांमधील पटसंख्या ही ० ते १० संख्येच्या आतमध्ये आहे. या शाळेत चालु शैक्षणिक सत्रात १६९ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना ६१ शिक्षक शिकवण्याचे काम करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, एकही शाळा बंद करण्यात येणार नाही व शाळांमधील एकाही शिक्षकाची नोकरी कमी करण्यात येणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले असले तरी समायोजनाच्या निर्णयामुळे भविष्यात समायोजित विद्यार्थी तथा शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार ज्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे, तेथे रिक्त जागा नसल्यास शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे मुळातच बदल्यांवरून सुरू झालेल्या गोंधळात आता अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.