बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. आरोग्य विभागाने एक लाख डोसची मागणी केली होती. परंतु, केवळ १५ हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे लसीकरणाला अडचणी येत आहेत. स्टॉकअभावी सोमवारी १४३ पैकी ३३ केंद्रे बंद ठेवावी लागली होती. विशेष म्हणजे आलेल्या डाेसमधून प्रत्येकाला २०० डोस देण्यात आले होते. काहींचे दुपारीच संपले, तर काहींचे बाकी असून ते आज, मंगळवारी संपण्याची शक्यता आहे. नवीन लस येण्याबाबत काहीच नियोजन नसल्याचे समजते.
सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर सध्या लसीकरणाला प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीचा मृत्यू न झाल्याने लोकांचा विश्वास वाढला आहे. परंतु, लसीचा तुटवडा असल्याने ती लाभार्थ्यांना मिळत नाही. अगोदरचेच उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान असून, १ मे पासून नवे आव्हान पेलावे लागणार आहे.
१ मे पासून लस विकत की मोफत?
n १ मे नंतर १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जाणार आहे. परंतु, केंद्र शासनाने केवळ ४५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याखालील वय असलेल्यांना लसबाबत राज्य शासनावर निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.
n राज्य शासनाने अद्यापही लस विकत घ्यायची की मोफत, याबाबत खुलासा केलेला नाही.
जिल्ह्याला नऊ लाखांचे उद्दिष्ट आहे. परंतु, आतापर्यंत केवळ दोन लाख एक हजार ५२८ लोकांना लस दिली आहे. अद्यापही सात लाख लोक बाकी आहेत. त्यांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात लोकांच्या मनात गैरसमज होेते, त्यामुळे लस उपलब्ध असतानाही लोक पुढे येत नव्हते. यात हेल्थ केअर वर्कर्सचाही समावेश होता.
दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात झाली. त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत केवळ ३५ हजार लोकांनी लस घेतल्याचे सांगण्यात आले.
आता तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याचा निर्णय झाला आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे किमान २५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले.
नऊ पैकी दोन लाख लोकांना लस
जिल्ह्यात जवळपास नऊ लाख लोक लाभार्थी आहेत. आतापर्यंत दोन लाख लोकांना लस दिली आहे. लसीचा तुटवडा आहे. कमी प्रमाणात लस येत असल्याने अडचणी आहेत. आम्ही एक लाख डोस मागितले होते, परंतु केवळ १५ हजार मिळाले आहेत.
-डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर.