बीड : तालुक्यातील तांदुळवाडी (हवेली) या गावातील सिंदफना नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असताना, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून वाळू भरलेल्या ६ वाहनांसह ३३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.
बीड ग्रामीण हद्दीतील तांदुळवाडी (हवेली) या गावाजवळील सिंदफना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पथकप्रमुख सपोनि विलास हजारे यांना मिळाली होती. त्यांच्यासह सहकारी पोलीस कर्मचारी राऊत, शेख, बास्टेवाड, मोरे, भिलारे यांनी सापळा रचून नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी वाळूने भरलेले ५ ट्रॅक्टर व १ टेम्पो आढळून आले. माहिती घेतली असता, त्यांच्याकडे वाळू उपशाचा कोणताही परवाना आढळून आला नाही. सर्व वाहने जप्त करून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली तर सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले. सपोनि विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक जुबेर सत्तार शेख (रा. हुसेनिया कॉलनी तेलगाव), सखाराम तुकाराम खोड (रा. पारगावसिरस, ता.बीड), राजू नामदेव सांगे, पांडुरंग भानुदास कोळेकर, अशोक राधाकिसन पौळ (रा. तांदुळवाडीहवेली ) व इतर ६ अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
ठाणेप्रमुखांवर होणार कारवाई ?
जिल्ह्यातील कोणत्याही ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा किंवा पथकाकडून मोठी कारवाई केली तर, संबंधित ठाणेप्रमुख अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी दिले होते. त्यामुळे पुढील काळात नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.