गेवराई : शहरातील शास्त्री चौकातील ३३ दुकानांवर अखेर आज नगर परिषदेचा हातोडा पडला. सकाळी ६ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांच्या आदेशाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही दुकाने पाडण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शास्त्री चौकात नगर परिषदेने १९८० साली ३३ दुकाने उभारली. काही व्यापाऱ्यांनी भाडेतत्वावर दुकाने घेतली. दरम्यान, या दुकानांच्या मागे नगरपरिषदेने २००४ व २०१० मध्ये तब्बल १८ गाळ्यांचे बांधकाम केले. नवीन दुकानांचा लिलाव देखील झाला आहे. त्यानंतर समोरील जुनी दुकाने पडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. मात्र, जुन्या दुकानांतील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत पाडापाडीच्या आदेशाला स्थगिती मिळवली.
अनेकवेळा नगरपरिषदेने ही दुकाने पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत. मात्र जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या आदेशाने सकाळी ६ च्या सुमारास नगर परिषद, पोलिस प्रशासन, महसूल अधिकार व कर्मचारी यांच्या पथकाने जुनी ३३ दुकाने जमिनदोस्त केली. यामुळे शास्त्री चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, न्यायालयात प्रकरण सुरु असतानाही नगर परिषदेने पाडापाडी कशी केली? असा सवाल करत व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला.