लातूर येथील एक कंपनीतून आणलेले ५० तेलाचे डबे आणि मिलमधून आणलेले २५० बेसनाचे कट्टे टेम्पोत (एम.एच.-४४ यू.-०९९२ ) भरून टेम्पोचालक जनार्दन उत्तमराव उघडे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) ९ मे २०२१ रोजी हा माल घेऊन लातूरहून पुणे येथे निघाले होते. रात्री ९ ते १० वाजेदरम्यान केजहून मांजरसुंब्याकडे जात असताना मस्साजोगच्या अलीकडेच चोर टेम्पोवर चढले. चोरांनी टेम्पोवरील ताडपत्री फाडून टेम्पोतील १९ हजार ५९४ रुपये किमतीचे गोडेतेलाचे ९ डबे आणि १३ हजार ७०० रुपये किमतीचे बेसनाचे ४ कट्टे काढून घेत चोरटे पसार झाले.
मस्साजोगपासून काही अंतरावर असलेल्या माउली रसवंतीजवळ आल्यावर टेम्पो चालकाने टेम्पोच्या चाकातील हवा चेक केल्यावर त्याला टेम्पोची ताडपत्री फाटल्याचे दिसून आले. तेलाचे डबे व बेसन कट्टे गायब झाल्याचे निदर्शनास आले. टेम्पोचालक जनार्दन उघडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.