बीड - माजलगाव शहरासह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी गुटखा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यावर रात्री 12 वाजता येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ठिसले यांनी कारवाई केली. या कारवाईत दोन वाहनासह जवळपास 34 लाख 50 हजार रुपयाच्या मुद्देमालासह गुटखा पकडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माजलगाव शहर व तालुक्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुटख्याचा होलसेल व्यवसाय करणारा येथील रवी संक्राते हा रात्री 12 वाजता महिंद्रा जीतो एम.एच.13-6968 व छोटा हत्ती एम.एच.44 यु 0857 यामध्ये गुटखा घेऊन बाहेर गावी जात असल्याची माहिती खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यावरून येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ठिसले यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहने पकडून ताब्यात घेतली. गुटखा विक्रेता रवी संक्राते हा इथून पळ काढण्यात यशस्वी झाला. या दोन्ही गाड्यासह गोडाऊनमध्ये जवळपास 30 गुटख्यांची पोती, (किंमत अंदाज 22 लाख 50 हजार) असून दोन्ही गाड्यांची किंमत 12 लाख 50 हजार रूपये होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर गुटखा व वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत ठिसले यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटका विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अन्न व प्रशासन अधिकारी यांना पाचारण करण्यात आले असून ते आल्यानंतर संबंधित व्यक्ती व गाड्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या कारवाई कामी शैलेश गादेवार, रवि राठोड व खराडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.