लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत मंगळवारी पाच भरारी पथकाने विविध ठिकाणी ३५ कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर रेस्टिकेटची कारवाई केली. यवर्षीच्या परीक्षेतील एकाच दिवशी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.मंगळवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषयाचा पेपर होता. यावेळी पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील जवाहर उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रात शिक्षणाधिकारी प्रा.राजेश गायकवाड यांच्या पथकाने २३ कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना रेस्टिकेट केले, तसेच याच पथकाने पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील कला, विज्ञान महाविद्यालयात ५ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. प्राचार्य विनोद देवगावकर यांच्या पथकाने वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रात एका विद्यार्थ्यावर कारवाई केली. उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्या पथकाने माजलगाव येथील सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रात ३ तर सुंदरराव सोळंके महाविद्यालय केंद्रात २ विद्यार्थ्यांना रिस्टिकेट करण्यात आले. तर शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने तेलगाव येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रात एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.
भूगोल विषयाला कॉपी करणारे ३५ विद्यार्थी रेस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:44 AM