बीड : जिल्ह्यात राज्य परीवहन महामंडळाची बस प्रवासासाठी सुरक्षित समजली जाते. परंतु मागील वर्षभरात ३७६ बसेसने प्रवाशांची साथ अर्ध्या रस्त्यात सोडली आहे. स्प्रींग तुटणे, टायर पंक्चर, अपघात अशा विविध कारणांमुळे या बस खराब थांबल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे आठ आगार आहेत. याअंतर्गत ५३२ बसेस आहेत. प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी या बसेस २४ तास धावत असतात. चालक, वाहकही प्रामाणिक कर्तव्य बजावता. वाहतूक निरीक्षक, आगारप्रमुख यांच्याकडे बसेस वेळेवर सोडण्यासाठी नियोजन केले जाते. परंतु काही बसेस रस्त्यातच स्प्रींग तुटणे, टायर पंक्चर, अपघात, स्टार्टमध्ये बिघाड, एअर लॉक होणे, इंजिन बंद पडणे अशा वेगवेगळ्या कारणांनी बंद पडतात. किरकोळ बिघाड असेल तर चालक, वाहकच दुरूस्त करतात. परंतु माेठी बिघाड असल्यास तात्काळ ब्रेकडाऊन व्हॅनला संपर्क केला जातो. अवघ्या काही तासांत ही बस बिघाड झालेल्या बसच्या ठिकाणी पोहचले. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून मार्गस्थ केल जाते. प्रवाशांना ताटकळत अथवा त्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी रापमकडून प्रयत्न केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
४३ खराब बसेस भंगारात
ज्या बसेसचे वय १० वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा १० लाख किमी अंतर कपात केले आहे, अशा बसेस भंगारात विकल्या जातात. यावर्षी ४३ बसेस भंगारात विक्री केल्या आहेत. ही सर्व कारवाई विभागीय यंत्र अभियंता यांच्यामार्फत करण्यात येते.
मेंटनन्ससाठी लाखोंचा खर्च
बिघाड झालेल्या बसेस दुरूस्त करणे, त्यांचे नियमित मेंटनन्स करणे यासाठी रापमकडून वर्षाकाठी लाखोंचा खर्च केला जातो. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाते. बस आगाराच्या बाहेर पडण्यापूर्वी एका तंत्रज्ञाकडून बसची तपासणी केली जाते. तसेच बस चालकानेहीही बस तपासून घेणे बंधनकारक असते.
लॉकडाऊनमुळे संख्या कमी
२०२० या वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे सर्व बसेस जागेवरच होत्या. त्यामुळे रस्त्यात बिघड होणाऱ्या बसेसचा आकडा कमी आहे.वर्षभर बसेस धावत राहिल्यास हा आकडा ५०० पेक्षा जास्त होतो, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोट
स्प्रींग तुटणे, टायर पंक्चर, अपघात, स्टार्टमध्ये बिघाड, एअर लॉक होणे, इंजिन बंद पडणे अशा विविध कारणांमुळे बसेस अचानक रस्त्यात बंद पडतात. त्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्ह्यात पाच ब्रेकडाऊन व्हॅन आहेत. प्रवाशांचे हाल होणार नाहीत, यासाठी दुसरी बस तात्काळ उपलब्ध केली जाते.
कालिदास लांडगे
विभागीय यंत्र अभियंता, बीड
---
जिल्ह्यातील एकूण बसेस - ५३२