अंबाजोगाई : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या १० दिवसांत अंबाजोगाईत ३८७ जण बाधित निघाले, तर मार्च महिन्यात आतापर्यंत ५०४ जण बाधित निघाले. आतापर्यंत तालुक्यात तीन हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. अशी भयावह स्थिती असतानाही नागरिकांना याचे गांभीर्य नाही. सार्वजनिक ठिकाणी अजूनही वाढती गर्दी कायम राहिल्याने संभाव्य धोका वाढला आहे. तर, शहरवासीयांना कोरोनाच्या त्रिसूत्रीचा विसर पडला आहे.
कोरोनाला प्रारंभ झाल्यापासून जून महिन्यापर्यंत अंबाजोगाईत कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र, गेल्या नऊ महिन्यांत अंबाजोगाई तालुक्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. शहरात नवीन रुग्ण व सहवासित रुग्ण यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस भरच पडू लागली आहे. शहरातील स्वाराती रुग्णालय व लोखंडी सावरगावचे कोविड रुग्णालय हाउसफुल्ल झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासमोर चिंता व्यक्त करणारी ठरत आहे. अशा स्थितीतही शहरवासीयांना कोरोनाचे गांभीर्य नाही. शहरात सार्वजनिक ठिकाणी अजूनही गर्दी कायम आहे. शासनाने बाजार बंद केले असले, तरी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे विक्रेते कसल्याही प्रकारचे बंधन पाळत नसल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. शासनाने विनामास्क फिरणाऱ्यांकडून हजारो रुपये दंड वसूल केला, तरी परिस्थिती जैसे थे आहे. अशी स्थिती राहिली तर अंबाजोगाई शहर बंद ठेवण्याचा पर्याय शासनासमोर राहील.
अंबाजोगाई शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. असे असतानाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक त्रिसूत्रीचे पालन व्यापारी व ग्राहकांकडून होत नाही. मास्कच्या वापराकडे कमालीचे दुर्लक्ष केले जाते. सामाजिक अंतर पाळले जात नाही. शासनाने कोरोनाबाबतची त्रिसूत्री पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते.
...तर कठोर उपाययोजना आखू
उपजिल्हाधिकारी शरद झाडके
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयात व लोखंडी येथील कोविड रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आहे. शहरातील नागरिकांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचे पालन व्यवस्थित न केल्यास शहरासाठी कठोर उपाययोजना लागू करण्यात येतील. वेळीच गांभीर्य बाळगून कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, अन्यथा कडक लॉकडाऊनसारख्या पर्यायाला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशारा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिला आहे.
===Photopath===
180321\img-20210311-wa0103_14.jpg~180321\img-20210311-wa0102_14.jpg
===Caption===
रुग्णांचे वौते प्रमाण, कोरोनाचे नाही भान : अंबाजोगाईत शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीला हरताळ फासला जात असल्याने रुग्ण वाढत आहेत.