राम लंगे
वडवणी : राज्यातील १२ अति मागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता शासन निर्णयानुसार मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर २०११-२०१२ पासून मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती २२ जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांपर्यंत वाढविण्यात आली. बीड जिल्ह्यातील वडवणी हा एकमेव तालुका मानव विकासमध्ये समाविष्ट करण्यात आला असून विविध योजना राबविल्या जात आहेत.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ई-निविदा काढून वडवणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण २३ शाळांमध्ये ३९ लक्ष रुपये खर्चून जवळपास ३ हजार ५०० विद्यार्थ्यांना संगणक लॅब स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे भाजपाचे युवा नेते धनराज मुंडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला यश आले. तसेच तालुक्यातील शाळांमध्ये ५ लक्ष रुपयांची पुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहेत. ११ लक्ष रुपयांचे विज्ञान साहित्य सुद्धा वाटप होणार आहे. यासाठी सुद्धा प्रक्रिया झालेली आहे.
यामुळे वडवणी शहर व ग्रामीण भागातील ऊसतोड गरीब, होतकरू, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना खरा न्याय मिळाला आहे. चिखलबीड येथील जि.प. सदस्य अनिता मुंडे, धनराज मुंडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
या शाळांना संगणक लॅब मंजूर
जि.प.प्रा. शाळा बाहेगव्हाण, साळींबा, कन्या शाळा वडवणी, पुसरा, हिवरगव्हाण, पिंपरखेड, कवडगाव, खळवट लिंबगाव. हरिश्चंद्र पिंपरी, चिंचोटी, काडीवडगाव, परडी, लवुळ-२, देवगाव, कोठरबन, सोन्ना खोटा, पिंपळटक्का, पिंपळारुई, चिखलबीड, देवळा, खडकी, मोरवड, उपळी- खुर्द या गावांतील शाळांना संगणक लॅब मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
वडवणी तालुक्यात २३ शाळांसाठी ३९ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. तालुका शैक्षणिक दृष्टीने मागास असल्याने व मानव विकास निर्देशांक कमी असल्याने तो वाढविण्यासाठी शासन योग्य त्या उपाययोजना करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गुणवत्ता वाढेल. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल.
- बाबासाहेब उजगरे, गटशिक्षण अधिकारी, वडवणी