लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गृह विभागाकडून घेतलल्या जागेत जिल्हा रूग्णालयाची नवीन २०० खाटांची इमारत उभारणार आहे. मागील वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबीत होता. अखेर याला मंजुरी उच्चस्तरीय समितीकडून तत्तता: मंजुरी मिळाली आहे. या इमारतीसाठी ७९ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. सहा महिन्यात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन इमारत बांधकामाला सुरूवात होऊ शकते, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.जिल्हा रूग्णालयाच्या विस्तारिकरणाचा विषय मागील वर्षभरापासून प्रलंबित होता. सध्या ३२० खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयात आजही अंतररुग्णांची संख्या पाचशेच्या वर आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. तसेच डॉक्टर, परिचारीकांनाही सेवा देण्यास अडचणी येत आहेत. हाच धागा पकडून जिल्हा रुग्णालयाला विस्तारीकरणाचा विषय हाती घेतला. मात्र जागा उपलब्ध नव्हती. मग रूग्णालयाच्या बाजुलाच असलेली गृह विभागाची दीड एकर जागेची मागणी केली. याला मान्यताही मिळाली. तात्काळ या ठिकाणी २०० खाटांची क्षमता असलेले रूग्णालय मंजुर झाले. तांत्रीक मान्यता मिळाल्यानंतर ही फाईल उच्चस्तरीय समितीच्या टेबलवर होती. सोमवारी यासंदर्भात मुंबईत बैठक झाली. याला मंजुरीही मिळाल्याचे सांगण्यात आले. आता प्रशासकीय आदेश निघून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी वारंवार संपर्क केला, मात्र त्यांनी भ्रमणध्वनी घेतल्याने बाजू समजली नाही.१०० खाटांचे माता व बाल रूग्णालय आगोदरच मंजुर झालेले आहे. त्याचे बांधकामही सध्या प्रगतिपथावर आहे. यासाठीही ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. त्यानंतर २०० खाटांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. अखेर सोमवारी याला मान्यता मिळाली आहे.किती मजली आणि कोठे काय असेल?जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात जागा आल्यानंतर त्यावर साधारण पाच मजली बांधकामाचे नियोजन आहे.यामध्ये पहिल्या मजल्यावर बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रीयागृह असेल. तर वरच्या मजल्यावर प्रत्येकी आठ वार्ड व प्रत्येक वार्डात पाच खोल्यांचा समावेश असेल. यासाठी किमान ७९ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
अखेर २०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:06 AM