बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

By सोमनाथ खताळ | Published: August 30, 2024 12:17 PM2024-08-30T12:17:47+5:302024-08-30T12:21:41+5:30

मग आष्टीत धस, धोंडे, गेवराईत पंडित अन् बीडमध्ये मस्के, जगतापांचे काय?

4 Vidhan Sabha seats to NCP Ajit Pawar in Beed Dist; Dhananjay Munde's statement upset BJP, Shinde Sena supporters | बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी चार जागा राष्ट्रवादीच्या आणि सहाही जागा महायुतीच्या विजयी होतील, असा वादा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर केला. मग आष्टीत भाजपचे इच्छुक असलेले माजी आ. सुरेश धस, भीमराव धोंडे, गेवराईत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित तर बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे काय होणार? असा प्रश्न आहे. मुंडे यांच्या वक्तव्यामुळे इच्छुक उमेदवारांची कहीं खुशी, कहीं गम अशी अवस्था झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवारी सकाळी बीडमध्ये आले. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सभा झाली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत काही सुचक वक्तव्य केले. जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. पैकी चारही जागा राष्ट्रवादीच्या आणि सहाही जागा महायुतीच्या निवडून येतील असे सांगितले. सध्या जिल्ह्यात केज व गेवराईत भाजपचे तर परळी, आष्टी आणि माजलगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. बीडमध्ये शरद पवार गटाचे आमदार आहेत. या जागेवरही अजित पवार गटानेच दावा केल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

बीडमध्ये युतीचे तिघेही इच्छुक
बीडची जागा युती असताना शिवसेनेसाठी असायची. राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत होत असे. परंतु आता हे दोन्ही पक्ष युतीत आले आहेत. येथे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तर अजित पवार गटाकडून डॉ. योगेश क्षीरसागर उमेदवारीचा दावा करत आहेत. सध्या एकत्र असताना राष्ट्रवादीचा आमदार असल्याने अजित पवार गट यावर दावा करत आहे. तर शिवसेनेसाठी ही जागा आतापर्यंत होती, असे म्हणत शिंदे गट दावा करत आहे.

अमरसिंह पंडितांना काय म्हणाले?
सध्या गेवराईत भाजपचे आमदार आहेत. याच ठिकाणी अजित पवार गटाचे जि. प. माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित इच्छुक आहेत. या जागेबद्दल बोलताना पालकमंत्री मुंडे यांनी माजी आ. अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहून 'तुमचा विशेष विचार केला जाईल' असे म्हणत उमेदवारीचे संकेत दिले.

भाजपचे इच्छुक अस्वस्थ
बीडसह माजलगाव, आष्टी आणि परळीची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे संकेत धनंजय मुंडे यांनी दिले. त्यामुळे या मतदारसंघातील भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. केजमध्ये अजित पवार गट व शिंदे गटाचे फारसे इच्छुक नाहीत, परंतु गेवराईतून पंडित इच्छुक आहेत.

कोणत्या मतदारसंघात काय अवस्था
आष्टी मतदारसंघ
विद्यमान आमदार - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
भाजपचे इच्छुक - सुरेश धस, भीमराव धोंडे

गेवराई
विद्यमान आमदार - लक्ष्मण पवार (भाजप)
अजित पवार गटाचे इच्छुक - विजयसिंह पंडित

बीड
विद्यमान आमदार - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी शरद पवार गट)
अजित पवार गटाचे इच्छुक - डॉ.योगेश क्षीरसागर, बळीराम गवते, तय्यब शेख
भाजपचे इच्छुक - राजेंद्र मस्के
शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक - अनिल जगताप

केज
विद्यमान आमदार - नमिता मुंदडा (भाजप)
अजित पवार गटाचे इच्छुक - सध्या तरी प्रबळ दावेदार कोणी नाही

माजलगाव
विद्यमान आमदार - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी अजित पवार गट)
भाजपचे इच्छुक - रमेश आडसकर, मोहन जगताप, नितीन नाईकनवरे, बाबरी मुंडे
शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक - तुकाराम येवले
अजित पवार गटाचे इच्छुक - जयसिंह सोळंके, अशोक डक

परळी
विद्यमान आमदार - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
भाजप - प्रबळ दावेदार नाही
शिवसेना शिंदे गट - प्रबळ दावेदार नाही

Web Title: 4 Vidhan Sabha seats to NCP Ajit Pawar in Beed Dist; Dhananjay Munde's statement upset BJP, Shinde Sena supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.