बीड : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनमध्ये सर्रासपणे वाळू उपसा केला जातो. यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांत बुडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. याला तहसीलदार, राक्षसभुवन सरपंचासह वाळू माफियाच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तब्बल ४० लोकांनी मुंडण करत जोरदार घोषणाबाजी केली.
राक्षसभुवन परिसरातील गोदावरी पात्रातून सर्रासपणे वाळू उपसा केला जात आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करते. याच दुर्लक्षामुळे २८ ऑगस्ट रोजी गावातील नेहा व अमृता धर्मराज कोरडे या दोन चिमुकल्या मुलींचा वाळू उपसा झालेल्या खड्ड्यांत पडून मृत्यू झाला. तसेच नदीच्या पैलतीरावरही जिजाबाई पाटेकर यांचा बुडून मृत्यू झाला होता. हे केवळ वाळू माफियांमुळेच झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच यांच्यावरही गुन्हा नोंद करावा, अशी मागणी रासपच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच मृत मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली. जवळपास ४० लोकांनी मुंडण करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी शेळी, मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडताले, जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई सारूक, दत्ता काळे, भागवत जवंजाळ, आण्णासाहेब मतकर, रेखा शिंदे, अशोक हात्ते, पोपट भावले, बाळू मारगुडे, पवन गावडे, मंगेश चोरमले, विक्रम सोनसळे, भागवत चोपडे, कृष्णा धापसे आदींची उपस्थिती होती.
180921\18_2_bed_12_18092021_14.jpg
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करताना रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिसत आहेत.