लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : आष्टी तालुक्यातील सावरगाव, वेलतुरी या परिसरांतील तलावात पावसाळ्याच्या तोंडावरही ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या डोंगरपट्ट्यात चांगला पाऊस झाला होता. यामुळे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके चांगलीच साधली होती. परंतु कोरोनामुळे शेतीमालाला कवडीमोल भाव मिळाला. आता पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे.
सध्या डोंगरपट्ट्यातील शेडाळा, देवळगाव, सावरगाव, वेलतुरी, गंगादेवी, गहूखेल या गावांनी आंबा, डाळिंब व संत्रा या फळबागांनी चांगलाच तग धरला आहे. सध्या या परिसरात चराऊ म्हणून घास व मका ही पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. यंदाचा पावसाळा तोंडावर आला तरीही डोंगरपट्ट्यातील सावरगाव, वेलतुरी तलावात ४० पाणी साठा उपलब्ध आहे.
डोंगरपट्टा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. येथे दुष्काळाला तोंड देताना मोठी कसरत करावी लागते. या गावांना प्रत्येक वर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यंदा मात्र या परिसरातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबलेली पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर चारा ही उपलब्ध असल्याने जनावरांची उपासमार ही थांबली आहे. हवामान खात्याने यंदा ही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी केली असून, शेती मशागतीची कामे पूर्ण केली आहेत.
....
आमच्या भागात दुष्काळ हा आमच्या पाचवीलाच पुजलेला असतो. गेल्या वर्षी मात्र चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे गेली वर्षभर पाणीटंचाई जाणवली नाही. देव बाप्पा यावर्षीही चांगली आगूट साधू दे.
-बाळासाहेब म्हस्के, शेतकरी, सावरगाव
.....
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता. यामुळे मी उसाची लागवड केली. तलाव जवळ असल्याने फळबाग लागवडही केली आहे. संत्रा, लिंबू झाडे चांगली बहरली आहेत. पावसाळा आता तोंडावर आला आहे. वेलतुरी तलावातही अजून ४० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची स्थिती कोेठेही दिसत नाही.
-संजय जपकर, प्रगतिशील शेतकरी, वेलतुरी
===Photopath===
110521\11bed_4_11052021_14.jpg
===Caption===
बेलतुरी तलाव